नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

आरोग्य शिक्षण

 

                    आरोग्य उत्तम राखणे ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे आरोग्यविषक चांगल्या सवयी बालवयातच लागणे आवश्यक आहे. शारिरीक शिक्षण हे आरोग्य संपादन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. शारिरीक शिक्षणामुळे निरनिराळ्या क्षमतांचा विकास होतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारते. आरोग्यासाठी आरोग्यकारक सवयी अंगी बाणणे आवश्यक आहे.
त्या सवयी पुढीलप्रमाणे –


वैयक्तिक स्वच्छता –   वातावरणातील जंतूंपासून संरक्षण व्हावे म्हणून शरीराच्या सर्व अवयवांची स्वच्छता ठेवणे जरुरीचे आहे.

पादत्राणे –     बाहेरुन घरात आल्यावर सर्वप्रथम आपली पादत्राणे जागेवर ठेवावी. नंतर हात, पाय, तोंड साबण लावून स्वच्छ धुवावे. पायमोजे रोजच्या रोज धुवावे.

 कपडे –    रोज वापरायचे कपडे साधे, स्वच्छ धुतलेले आणि सुती असावे. कपडे हालचाली करण्यास सुलभ असावे. बाहेरुन आल्यावर कपडे बदलावे. हवेतील धूळ, जंतू व इतर हानीकारक जीवाणू कपड्यांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. शरीराला येणारा घाम कपड्यांमध्ये शोषला जातो व हे कपडे पुन्हा घातल्यास दुर्गंधी येते, त्यामुळे त्वचेचे अनेक रोग होण्याची शक्यता असते, म्हणून रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत. बाहेरुन आल्यावर आंघोळ करावी व घरात घालायचे कपडे घालावे.

अंघोळ –     दररोज सकाळी अंघोळ करावी. दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळीही अंघोळ करावी, म्हणजे जंतुसंसर्गास प्रतिबंध होईल.

नखे –     वाढलेल्या नखांमध्ये धूळ व जंतू अडकून राहतात आणि जेवणावाटे पोटात जातात, त्यामुळे रोगसंसर्ग होऊ शकतो, म्हणून नियमितपणे नखे नेलकटरने कापावीत. नखे कुरतडू नयेत.

केस –   केसांमध्ये धूळ अडकून राहते, कोंडा होतो, उवा होतात, कोस राठ होतात, गळतात. नवीन आलेल्या केसांची वाढ होत नाही, म्हणून केसांची नियमितपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे. डोक्यावरुन अंघोळ करताना शांपू व साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा. डोके धुण्यासाठी शिकेकाई किंवा रिठे यांचा वापर करावा.

डोळे –   रोज सकाळी उठल्यावर तोंड धुताना डोळे स्वच्छ धुवावेत. डोळ्यांतील घाण काढावी. टीव्ही, व्हिडीओ पाच फुटांपेक्षा कमी अंतरावरून पाहू नये. जास्त वेळ टीव्ही पाहू नये. वर्गात फळ्यावरील अक्षरे स्पष्ट दिसत नसल्यास किंवा पुस्तकातील मजकूर नीट वाचता येत नसल्यास किंवा वाचताना डोके दुखत असल्यास शिक्षकांना व पालकांना सांगावे.

नाक –    नाक नेहमी स्वच्छ ठेवावे. नाकात पेन्सिल, काडी, कागद, रबर, दाणे, खडे, मणी, गोटी यांसारख्या वस्तू घालू नयेत. सर्दी व पडसे झाल्यास जवळ रुमाल बाळगावा. इतरांचे रुमाल वापरु नयेत. नाक कोठेही शिंकरु नये. जास्त सर्दी झाली असल्यास इतरांना संसर्ग होऊ न देण्याची काळजी घ्यावी.

कान –    कानात पेन, पेन्सिल, काडी, कागद, सेफ्टिपिन, क्लिप यांसारख्या वस्तू घालू नयेत. कान सुजला असेल, कानातून पू येत असेल व त्यामुळे ऐकायला कमी येत असेल तर पालकांना सांगावे.

दात –    दातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. अन्नाचे कण दातांत अडकून राहतात व कुजतात, दातांमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होतो, इतरही रोगांची लागण होऊ शकते, म्हणून खाणे झाल्यावर प्रत्येक वेळी खळखळून चूळ भरावी. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे. दात स्वच्छ करण्यास टूथपेस्ट व योग्य ब्रशचा किंवा दंतमंजनचा उपयोग करावा.

परिसराची स्वच्छता –    शरीराच्या स्वच्छतेबरोबरच परिसराच्या स्वच्छतेलादेखील तितकेच महत्त्व आहे. डास व माश्या यांचा उपद्रव होऊ नये म्हणून घराभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आपले घर, घराभोवतालचा परिसर स्वच्छ असावा. चांगल्या व स्वच्छ परिसरामुळे मन आनंदी व उल्हासित होते. वर्गातील बसण्याचा बाक, वर्गाची फरशी, खिडक्या, दारे, फळा, डस्टर, वर्गात जाण्यायेण्याचा मार्ग इत्यादी स्वच्छ असावे. प्रत्येक वर्गात कचरा टाकण्यासाठी टोपली ठेवावी. ही टोपली स्वच्छ व झाकलेली असावी. आपण मैदानावर खेळतो ते मैदानही स्वच्छ ठेवावे.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा